Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र महिलांना हप्ता न मिळाल्याने निर्माण झालेल्या संभ्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “एकही पात्र लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही,” असा शब्द त्यांनी दिला. त्यामुळे पुन्हा e-KYC सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Eknath Shinde यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य करत महिलांना मोठा दिलासा दिला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे ₹३००० अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले असले तरी काही पात्र महिलांना अजूनही लाभ मिळालेला नाही. यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, “एकही पात्र लाडकी बहीण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही,” असा स्पष्ट शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा e-KYC प्रक्रिया सुरू होणार का, याबाबत राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य
अंधेरी येथील शेर-ए-पंजाब नगरमध्ये आयोजित लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, सरकारचा उद्देश केवळ सत्ता मिळवणे नाही, तर लोकांच्या मनात जागा निर्माण करणे आहे.
“आम्ही गरिबी पाहिली आहे. आमच्या आई आणि पत्नीने केलेली काटकसर पाहिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यावर लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला,” असे शिंदे म्हणाले.
पुन्हा e-KYC सुरू होणार?
लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांचे हप्ते e-KYC अपूर्ण राहिल्यामुळे थांबवण्यात आले होते. काही पात्र महिलांनाही तांत्रिक कारणांमुळे लाभ मिळाला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात मोठे प्रश्न निर्माण झाले होते.
मात्र आता “e-KYC होत राहील,” असे संकेत शिंदे यांनी दिल्याने महिलांना पुन्हा एकदा प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
७० लाख महिलांना योजनेतून वगळले
सरकारने निकषात न बसणाऱ्या सुमारे ७० लाख महिलांना योजनेतून वगळले आहे. तरीही काही पात्र महिलांचे अर्ज प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्याचा ₹३००० हप्ता राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकारकडून पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही”
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पुन्हा स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही.
“कुणी मायचा लाल आला तरीही ही योजना बंद होणार नाही,” असे ठाम वक्तव्य त्यांनी केले. यामुळे महिलांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
महिलांसाठी सरकारचे आणखी निर्णय
शिंदे यांनी महिलांसाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचाही उल्लेख केला. त्यामध्ये :
- एसटी प्रवासात ५०% सवलत
- मुलींचे उच्च शिक्षण मोफत
- नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय
यांसारख्या योजनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.











